चारोळ्या माझ्या मनातल्या या


एक दुःख तुझ्या आठवणीचं....
तू एकटी असताना तुझ्यासवे जगण्याचं
एक दुःख तुझ्या आठवणींचं ....
कधी रडता रडता तुझ्यासवे हसण्याचं
 ********************************************

 डोळ्यांत साठलेले... ते पाणी हळूच येता
मन कासावीस का झाले.......
तुझ्या शब्दांत गोठलेले .... आजवरचे शब्द माझे
आज विरघळून का गेले ......


 ********************************************
हे असे का घडते
नकळतच प्रीत जडते
क्षणात मन पराधीन होते
पण जिच्यासाठी मन झुरते
तिचे मन कळताच आपले मन क्षणार्धात तुटते ...
 *********************************************
तहान सागराची डोळ्यांत साठलेली
एक वाट वादळाची मनात दाटलेली
सांग ना कशी गं समजू मी
तुझ्या नयनांतील भावना गोठलेली
 *********************************************
पेरणारे पेरून जातात
वेचणारे वेचून जातात
वेचणारे वेचल्यावर 

भावनांना ठेचून जातात....
**********************************************
ती तारसप्तकातली एक चांदणी
आज मला म्हणाली .....
पाहिलंय रे मी तुला तिच्यासाठी झुरताना .....
ओल्या आभाळाखाली आठवणी पुरताना ......
 **********************************************
काळजाच्या प्रत्येक ठोक्यात फक्त तुझाच भास आहे
दंश करणाऱ्या सापालाच जणू वनवास आहे
बगळ्याविना फक्त माशालाच उपवास आहे
रीतच अशी जगाची मग का उलटा तपास आहे
 **********************************************
तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊसही
तुझ्या माझ्या मध्ये तेव्हा बरसायचा पाऊसही
भिजलेल्या मना माझ्या आठवतं ना तुला
तुझ्या माझ्या मध्ये तेव्हा असायचा पाऊसही....

********************************************** 
चांदण्या रातीत तुला शोधताना,
निखळता तारा आसवांत आला
पेटलेला हा अंगार विझताना ,
कधीतरी येना चुकवून पावसाला